गॅस टंचाईविरोधात उद्धव सेनेचे आंदोलन

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : व्यावसायिक गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, गॅस सिलिंडरचा खुलेआम काळाबाजार होत आहे, याविरोधात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.२७) शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने शहरातील २३ गॅस एजन्सींना निवेदनही दिले.
घरगुती व व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच विक्री करावी, काळाबाजार तत्काळ थांबवावा, तसेच नागरिकांना वेळेवर होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध करून द्यावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, आदी विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी चढ्या दराने गॅस सिलिंडर विक्री करणार्‍या एजन्सीधारकांना जाब विचारत, सर्वसामान्यांची लूट थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाइलने धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, मयूर पार्क परिसरात भारत गॅस एजन्सीची एक गाडी शिवसैनिकांनी पकडली. निवासी भागात अवैध पद्धतीने गॅसची विक्री सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच हर्सूल पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, उपजिल्हाप्रमुख संतोष खंडके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.